रावी किनार्यावरून
रावी किनाऱ्यावरून ……
हिमाचल प्रदेश च्या डलहौसी कडून चंबा ला जाणाऱ्या वाटेत रावी नदी लागते . रावी ची आमची भेट तशी अनपेक्षितच म्हणावी लागेल . पण त्यामुळेच मनातले किती आणि कुठले प्रवास जागे झाले त्याचा थांग लागत नाही . वाटा फुटेल तिकडे भटकण्याचा काळ सरकन निघून च गेला आयुष्यातून ,आता चे मार्ग फारच आखीव रेखीव आणि ठराविक वाटेने प्रवास करणेच झेपण्याचे झालेत . त्यामुळे आमचा हल्लीचा प्रवास बहुतांश पूर्वनियोजित ,वाचनातील संदर्भांच्या नोंदी घेत ,ऐकण्यात आलेल्या संदर्भांचे एकमेकांशी धागे जुळवत ,गुगल सर्च ची मदत घेत चाललेला असतो . नाही म्हणता मधेच प्रवासात कधीतरी अनवट नादाची वळणं येतात ,पण बदललेल्या comfort zone च्या प्राधान्यक्रमात तिकडे वळणं मात्र जमत नाही. तो अनवट नाद ,उधाणलेल्या वाटा खुणावत राहतात पण त्यांना भिडणं मात्र जमत नाही ,इतक्या आपणच आपल्या वाटा अडवून बसलेलो असतो . म्हणूनच की काय ,वाटेत अवचित आलेल्या रावी च्या अनवट वळणाने माझा प्रवास कुठे कुठे नेला ,माझ्या ठराविक वाटात रावी च्या प्रवासाने स्वतःच्या किती आडवाटा मिळवल्या . .
डलहौसी चा तीन दिवसांचा आमचा मुक्काम पंचफुलातील शंभर फुटावर वसलेल्या Birds N Chirps या Home Stay मध्ये होता ,त्याचे यजमान श्री .कँवल भल्ला यांनी हिमालयाच्या प्रेमात पडून तिथे स्थायिक व्हायचा निर्णय घेतला होता ,भल्ला जातिवंत फोटोग्राफर असल्यामुळे त्यांच्या मनात प्रत्येक ऋतू तील हिमालयाची अनेकविध रूपं वसतीला होती . हिमालयातील अनेक ठिकाणाबद्दल त्यांना बरीच माहिती होती ,त्यांच्या बोलघेवडे पणामुळे आणि निसर्गरम्य ठिकाणांचं वर्णनं करण्याच्या त्यांच्या विलक्षण हातोटीमुळे ते त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक Guest शी ते त्यांच्या आवडी निवडीनुसार ठिकाणांचे संदर्भ Share करायचे . त्यांनीच आम्हाला चंबा ला जावं असं सुचवलं ते चंबा धौलाधार आणि पीरपंजाल डोंगर रांगांच्या मध्ये वसलेलं असल्यामुळे तिथे दिसणारा अवर्णनीय नैसर्गिक व्ह्यू आमच्या बघण्यात यावा म्हणून आणि तिथे हस्तकौशल्याने बनणाऱ्या विशिष्ट कलाकुसरीच्या हातरुमालासाठी व चांदीच्या वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांची घडण बघण्यासाठी . . तेथील ऐतिहासिक महत्वाबद्दल ही ते आवर्जून बोलले . ते ऐकून आम्ही चंबा ला जायला निघालो . चंबा डलहौसी हून दोन तासांच्या अंतरावर आहे ,पण वाटेत लागणाऱ्या रावी लागते आणि रावी चा संदर्भ द्यायला मात्र भल्ला विसरले किंवा त्यांच्या वाटा उजळविणाऱ्या दिव्यात रावी चा दिवा नसावा . म्हणून की काय कुठलीही पूर्वकल्पना नसताना अनाहूत पाहुण्यासारखी रावी आमच्या वाटेत अवतरली . .
म्हणून रावी भेटीची रुजुवात ही विलक्षण च . डलहौसी हून निघाल्यावर काही वेळातच रस्त्यात एक विस्तीर्ण पात्राची ,महाकाय खडकं असणारी नदी भेटली ,त्यावरनं लांबच लांब आकाराचा रेल्वेचा पूल लटकत होता ,नदी मात्र आपल्या विस्तीर्ण पात्राला कवेत घेऊन आपली आगळी वेगळी ओळख जपण्याच्या ,दाखवण्याच्या प्रयत्नात होती . रेल्वेचा लांबच लांब पसरलेला पूल पाहून मनात लक्कन काहीतरी हललंच ,मग धावणारी गाडी थांबवून ड्रायव्हर ला वाटेत आलेल्या नदीचं नाव विचारलं ,त्याने ही लगबगीने सांगितलं ,”इसे रावी नदी कहते है ,यहां से पाकिस्तान कुछ ही मीलो की दूरी पर है ,और रावी नदी भारत और पाकिस्तान को अब सिर्फ पानी से जोडती है .” …. “रावी “ आणि “अब सिर्फ “या दोन शब्दांचा हिमाचली नाद किती तरी वेळ कानात गुंजत राहिला ,मग मीच न राहवून गाडीतून उतरून खाली नदीच्या दिशेने कॅमेरा सरसावून निघालेच ,मग चालता चालताच माझ्या आणि रावीच्या कडेकपारी धुंडाळून झाल्याच .
रावी ला संस्कृत मध्ये इरावती म्हणतात असं ही आठवलं ,शाळेत शिकताना हिमालयीन नद्यांच्या संदर्भात आलेली “रावी ,बियास ,सतलज “ही नाव आठवली ,त्याहून आवर्जून आठवलं गुलजारांच “रावीपार “,कारण भूगोलात शिकलेल्या रावीपेक्षा गुलजारांची रावी मनात किती तरी काळापासून ठसलेली होती . म्हणूनच त्या क्षणी रावी चा संदर्भ मनात रुजवणाऱ्या गुलजारांची आवर्जून आठवण आली .
गुलजारांनी मागे कधीतरी “गंगा आये कहां से “असं म्हणत शोधत “रावी “पर्यंत पोचवलच . मग असंच म्हणावं लागेल की “रावी “चा माझा प्रवास त्यांच्यापासूनच आणि त्यांच्यामुळेच सुरु झाला . त्या त्यांच्या रावीपार कथेविषयी सांगितल्याशिवाय या प्रवासात पुढे जाताच येणार नाही .
रावीपार ही गुलजारांची “रावीपार “कथासंग्रहात समाविष्ट झालेली त्याच शीर्षकाची कथा आहे . रावीपार मध्ये गुलजार भारत -पाकिस्तान फाळणी दरम्यान च्या अनुभवातून गुजरणाऱ्या दर्शन सिंह या शीख कुटुंबाची गोष्ट सांगतात . दर्शन सिंह त्याच्या कुटुंबासह पाकिस्तानातील एका टोडरमलपूर या गावात राहत असतो . गावातील हिंदू-शिखांवर फाळणी काळात हल्ला होतो ,त्यात दर्शन सिंहाचे कुटुंब भरडल्या जाते ,त्याच्या वडिलांचा करुण अंत होतो. त्या धक्क्याने गावातील आई गुरुद्वाऱ्याचा सहारा घेऊन ही हरवल्या सारखीच होते . त्याची बायको शाहनी त्याच वेळी तीव्र वेदनेने तडफडत जुळ्या मुलांना जन्म देते ,त्यातला एक नाजूक प्रकृतीचा जन्मतो . अशा परीस्थितीत तिथे राहणं मुश्किल झाल्यामुळे ,दर्शन सिंहाकडे भारतात घेऊन जाणाऱ्या रेफ्युजींच्या स्पेशल ट्रेन मध्येब बा यको मुलासह चढण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो . ट्रेनच्या त्यांच्या भारताकडे जाणाऱ्या प्रवासात वाटेत त्यांना रावी लागते आणि रावी च्या साक्षीने जे काही त्याच्या कडून घडतं ,ते म्हणजेच च रावीपार ची गोष्ट .अडीच पानाचाच अवकाश असलेल्या या कथेत दर्शन सिंह चं जुनं कुटुंब आहे ,नुकतीच त्याच्या कुटुंबाचा भाग झालेली त्याची नवजात जुळी मुलं आहेत , ,दर्शन सिंह चं दूर निघून जाणारं गाव आहे ,एकाच वेळी जवळची माणसं हरवणं ,नवीन जिवांच त्याच्या आयुष्यातील येणं आहे ,भारतातील आगमन आहे आणि पाकिस्तानातून जाणं आहे ,या सगळ्या ला साक्षीदार राहिलेली रावी आहे. ही गुलजारांची गोष्ट पहिल्यांदा वाचली त्याला झाली १२-१३ वर्षं ,तेव्हापासून रावी नदी च एक पात्र म्हणून मनात बसली होती . ,त्यानंतरच्या प्रत्येक वाचनात अडीच पानातील प्रत्येक शब्दातून दुभं गण्याचा इतिहासच उलगडत जातोय ,असं वाटायचं . जेव्हा रावी भेटली तेव्हा या अडीच पानात सामावलेलं सगळं पाठलाग करत आलं आणि रावी च्या माझ्या सगळ्या संदर्भांच्या वाटा रावीपार मधूनच फुटतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं .
एक शफ़फ़ कांच का दरिया
खनक जाता है किनारे से ,
देर तक उसकी आवाज
गुंजती है कानों में ।
माझा पुढचा सगळा प्रवास त्याक्षणी मग रावी पुढे स्तब्ध झालाच ,मनात आयुष्यातील सगळ्याच भल्या बुऱ्याची उजळणी झाली . रावी भौगोलिक दृष्ट्या भारत पाकिस्तान च्या सीमेवरून वाहते . रावी चा ७५%भाग भारतात आहे आणि उरलेला पाकिस्तानात . म्हणून ही रावी भारत पाकिस्तान फाळणीची महत्वाची साक्षीदार राहिलेली आहे ,तिने दोन मनं ,दोन देश कायमचे दुरावले जाण्याची सुरुवात पहिली . ,एकदा निर्माण झालेली दोहोतील दरी सांधण कठीणच हे तिला ठाऊकच होतं ,पण तिला त्यापेक्षा भीती वाटत मात्र वाटत आलीय leakages ची I am not worried about burst ,but worried about leakages .पण इथे burst ही तिथे फाळणीचा झाला एकदाच ,पण leakages होण्याची प्रक्रिया गेली कित्येक दशकं अव्याहत पणे सुरूच आहे .
माझा जन्म मराठवाड्यातील गंगाखेड चा ,गंगाखेड हे शहर गोदावरी नदीकाठी वसलं आहे ,म्हणून नदीचा माझा संबंध जन्मापासूनचाच ,वयाची सलग सुरुवातीची १४ -१५ वर्षं मी तिथे राहिलेय ,पण आयुष्यभरा साठीच नदी संस्कृती शी बांधून गेलेय . माझी शाळा नदीकाठची ,माझ्या बदलणाऱ्या प्रत्येक वर्गातून नदी दिसायची . त्यामुळे सुरुवातीच्या माझ्यातल्या प्रत्येक बदलांची ती साक्षीदार आहे असं माझं (च)वाटणं आहे . रावी सारखंच गोदावरीकडे ही खाली उतरून जायला लागतं ,म्हणून रावीकडे ही खाली उतरून जाताना गोदावरी आठवली . आता यानंतर गोदावरी कडे उतरून जाताना कदाचित रावी आठवेल . गोदावरी चं माझं नातं सुरुवातीच्या काळातील रोजच्या भेटीमुळे सवयीतून devlop झालं ,मग मला आतलंबाहेरचं , भलबुरं व्यक्त करण्यासाठी गोदावरी हक्काची वाटत राहिली . तो सवयीचा भाग होता ,सवयी लागतात ,सुटतातही . तशी ती सवय भौगोलिक दृष्ट्या गोदावरी पासून दुरावल्यामुळे तुटलीही . पण सुरुवातीचे ते तिच्या माझ्या नात्यातले साद-पडसाद मनाच्या तळाशी कुठेतरी शिल्लक राहिलेच .ते रावीच्या निमित्ताने पुन्हा जागे झाले . आता मनातलं बरंच काही व्यक्त करण्याची साधनं झपाट्याने वाढली पण आतलं आससून व्यक्त होण्याचा वेग मात्र मंदावला . माझ्या आयुष्यात पहिल्यांदा वाट्याला आलेलं पहाडाएवढं दुख : मी गोदावरीच्या साक्षीने झेललं ते म्हणजे माझ्या वडिलांचं अचानक जाण ,त्याचं ऋण कधी गोदावरी कडे व्यक्त करता आलं नाही ,कदाचित मी तिला आपलं मानून गृहीतच धरलं होतं . पण तिचं ते ऋण रावी कडे मात्र व्यक्त करावंसं वाटलं. वडिलांच्या आकस्मिक निधनाचा जाब मी विचारायचे वारंवार गोदावरीला ,त्यांच्या अंत्यविधीला मी नव्हते ही गोदावरी शेजारी म्हणून तर तिला जास्तच जबाबदार समजायचे .त्यानंतर मी जेव्हा जेव्हा गोदाकाठी जायचे तेव्हा वडिलांना जिथे अग्नी दिला त्याठिकाणी गेल्याशिवाय परतायचे नाही ,न बघता आगीच्या ज्वाळांची ती दृश्य माझा पाठलाग करायचे . तसंच रावीकाठी ही झालं ,रावी ने तर फाळणीच्या काळात रक्ताने खेळलेली होळी अनुभवली आहे. तिच्या नजरेसमोर तर अशा दृश्यांची चित्रमालिकाच असणार ,माझं माझ्या दृष्टीने असणारं पहाडाएवढं दुःखं
तिच्यासमोरचा तर छोटासा बिंदूच होतं ,अशा प्रसंगाचं ही किती मोल असतं,ते रावी मुले कळलं . आणि या समजुतीच्या परिघात आल्यावर ,माझं वैयक्तिक असं हे स्वतःला कुरुवाळणं हट्टाने मग मागेच सरलं . माझ्या burst मुळे दुभंगलेली मने आणि रावी समोरच्या burst ने दुभंगलेली मने या भावनेची सांगड घालण्याचा प्रयत्न चुकारपणे तेवढ्या उदात्त विचारानंतर ही केलाच . हिमालयाची भव्य पार्श्वभूमी असताना ,चहुबाजूनी निसर्गाची उन्मुक्त उधळण झालेली असताना ,त्या सगळ्यात उधाणलेल राहणं सोडून रावी च्या नशिबी भारताच्या रक्तरंजित इतिहासाचं पान होणं आलय ,दोन देशांतील जोडबिंदू ू म्हणून जुळून असणारी रावी विभाजनाची साक्षीदार म्हणून पुढे येण्याच्या प्राक्तनाचा भाग झाली ,हे ही तिचं दुर्दैव .
एवढ्या विस्तृत पटाची ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या रावी जवळ ही गोदावरी सारखंच मला माझं ओंजळभर मन रितं करावसं वाटलंच ,गोदावरीच्या पुलावरनं जाताना अनुभवलेली मनाची आंदोलनं इथं रावी पुलाकडे बघताना साथीला होतीच ,फक्त रावीमुळे स्वतःच्या बिंदुपासून सुरु होऊन व्यापक होत जाणाऱ्या माझ्या संवेदनशिलतेचा शोध घेता आला . भारत - पाकिस्तान फाळणीशी माझाच काय माझ्या मागच्या पिढीचा ही प्रत्यक्ष दुरान्वयेही संबंध आला नाही पण तो न येता ही मला त्या अनुभवाशी भिडता आलं ,त्या खोलवर रुतलेल्या जखमा माझ्या भावविश्वाचा अनंत काळापासून भाग असल्याचाच तो अनुभव होता .
गुलजारांच्याच रावी पार कथेतलं एक वाक्यं त्या संदर्भानेच टपकन पुढ्यात आलं,”सुनते थे आजादी आ चुकी है ,या आ रही है ,टोडरमलपूर कब पहुंचेगी पता नही चलता था .”भारताच्या पासष्ट वर्षाच्या स्वातंत्र्य पर्वातील कुठल्याही पर्वात हे वाक्यं अंगावर येणारं च आहे . भारताच्या आजादी च्या जल्लोषात मश्गुल न होताच रक्ताच्या थारोळ्यात पडलेले अनुभव घेणं रावीचं प्राक्तन होतं ,कुठल्याही धार्मिक ,भाषिक ,वांशिक देशीय अथवा राज्यीय भेदाच्या जोद्बिंदुवर वाहणाऱ्या नद्यांचच हे नंतर च्या काळात प्राक्तन झालं ,रावी ही त्याला अपवाद नव्हती .
विभाजनाची अथवा फाळणीची हीच एकमेकांपासून दुरावले गेल्याची जखम मनात खोलवर कळ उठवते ,मग हेच व्यापक पटाचं दुखः कधी वैयक्तिक दु :खाच्या बिंदूपाशी येउन थांबतं ,तर कधी वैयक्तिक बिंदुपासून सुरु होऊन व्यापक पटाच्या दु :खा शी समरस होण्याच्या उलट्या दिशेचा प्रवास ही त्याचा घडतो. फाळणीच्या वेदनेशी भारतातीलच नव्हे तर परदेशी कलाकारांनी त्यांच्या कलाकृतीतून भिडण्याचा प्रयत्न केलाय ,गझला लिहिल्यात ,कविता गुंफल्यात ,लघुपट ,चित्रपट केलेत ,पेंटींगस चितारल्यात ,तरी काहीतरी सुटून गेल्याचीच सगळ्यांची भावना आहे ,त्या खोलवर मातीत रुतल्या गेलेल्या ,अवकाश भर पसरलेल्या वेदनेशी पुरेशा सामर्थ्याने भिडता न आल्यासारखे काहीतरी . नवाब वाजीद अली शाह ने १९ व्या शतकात त्याचं प्रिय लखनौ शहर सोडावं लागल्यावर ,त्याच्या विरहात लिहिलेलं ,”बाबुल मोरा …। “किती अर्थाने relate व्हायचा प्रयत्न करतंय या सगळ्या भावनांशी आणि गेली पंचाहत्तर वर्षं कुंदनलाल सैगलांनी गायल्या पासून प्रत्येक गायकांना ते वेगवेगळ्या तऱ्हेने गावसंच वाटतं आहे ,ते भडभडणं व्यक्तच करावंसं वाटतं वेगवेगळ्या पद्धतीने . मग तो गाण्याचा सिलसिला भीमसेनजी ,किशोरीताई ,गिरीजा देवी -शोभा गुर्टू ,पं . अजय चक्रवर्ती ,पं . अजय पोहनकर ,पं . राजन-साजन मिश्रा ,जगजीत चित्रा ,उस्ताद बिस्मिल्ला खान ,पं . हरिप्रसाद चौरासिया ते आजच्या कौशिकी चक्रवर्ती ,त्रिना मुखर्जी पर्यंत सगळ्यांनाच विविध रागात ,विविध वाद्यांच्या माध्यमातून त्या भावनेशी भिडण्याची तीव्र इच्छा झालीच ,तरी “नैहर छुटो ही जाये ….” ही भावना हात सोडून जाणाऱ्या प्रिय माणसांची ,प्रिय प्रदेशाबद्दलची …. सार्वत्रिक तरी खूप व्यक्तिगत ,व्यक्त होऊन ही व्यक्त न झाल्यासारखी व्यक्त करून ही व्यक्त न करता आल्यासारखी . असं सगळं असून ही पुन्हा पुन्हा व्यक्त करण्याची आच कधी ही न संपणारी ,“नैहर छुटो ही जाये “ही दुसऱ्या मातीमध्ये ,दुसऱ्या माणसांमध्ये मुळं रुजवायचा प्रयत्न करणाऱ्या माणसाना सुटलेल्या सगळ्यांची याद आणणारी भावना आहे ,मुळं रुजली तरी मागच्या ओढत आणलेल्या धाग्यांनी मन मागे जातंच ,कुठेतरी प्रत्येकाचा हिरावला गेलेला आतला भाग कायमचा जुन्यांनी व्यापलेला असतो आणि त्याचं ही आपल्याशिवाय बरं चाललय हे मानायला मन तयार होत नाही . गुलजारांची अमृता प्रीतम च्या “पिंजर”
कादंबरीवर बेतलेल्या “पिंजर “चित्रपटाची नायिका सोडून आलेल्या देशाला आर्त स्वरात विचारते ,
“कौन तुझे पानी पुछेगा ,फसलें सिंचेगा
कौन तेरी माटी में थंडी छांव बिजेगा ?”
त्यातून ही पुढे जावं लागलं ,रावी वरचा ट्रेन वाहून नेणारा पूल ही या दृष्टीने प्रतीकात्मक वाटतो ,तो सगळ्यांना पुढे घेऊन जातो पण त्याला मागचं काही सोडवत ही नाही ,रावी किनाऱ्यावरून दिसणारा तो नदीवरचा पूल बघून “रावीपार “कथेतील ट्रेन चा प्रवासच आठवतो ,ट्रेन चं ते धडधडत पुढे धावणं स्थलांतराच्या वेदनेचं आक्रंदनचं वाटतं ,ते पुढे जातं आणि त्यातलं मागे सारले गेलेले दुखः गहिरं अधिकंच गहिरं होत जाते . “रावीपार “ कथेतील नायक दर्शन सिंह स्वतःचं वतन सोडून आल्याच्या भावनेत,स्वतःतलं विस्कटलेपण सावरले जाईल या आशेने जिवंत असणाऱ्या नवजात मुलाला मेलेला समजून त्याचं कल्याण होण्यासाठी रात्रीच्या गच्चं अंधारात रावी नदीत फेकून देतो आणि त्याच वेळी जिवंत मुलाच्या क्षीण रडण्याच्या आवाज येतो तर दुसरीकडे “हिंदुस्थान जिंदाबाद”च्या आवाजाने आसमंत दुमदुमतो ,इथेच कथा संपते ,पण तशी ती आपल्या मनातून संपत नाही .ती झिरपत झिरपत पुन्हा पुन्हा आपल्याला रावी किनारी आणून सोडते . रावी तिने ऐकलेल्या विजयी उन्मादाच्या नाऱ्यासह आणि नवजात बाळाच्या विझलेल्या प्राणासह आपल्या मनाच्या वसतीला कायमची येते . एकाच वेळी मुलाचा करुण अंत आणि हिन्दुस्थानच जिंदाबाद असणं हा अनुभव रावी ने तिच्या पुलासकट घेतलेला आपल्या मनात साठतो . अशाच वेळी ट्रेन ने याच दाहक धडधड्तेने घेतलेले अनुभवाचे संदर्भ मनात जागे होतात . ,त्यात बोरिस पास्तरनाक च्या “डॉ. झिवागो “मधील ट्रेन चा २००० मैल चा दीर्घ पल्ल्याचा प्रवास असतो ,श्याम बेनेगलांच्या “मम्मो “मध्ये मम्मोला पाकिस्तान ला जाणाऱ्या ट्रेन मध्ये जबरदस्तीने चढवण्याचा प्रसंग असतो,
खुशवंत सिंगच्या “ट्रेन तो पाकिस्तान “मध्ये अशीच एक frontier मेल धडधडत सतलज नदीवरून धावताना हजारो शिखांचे मृतदेह वाहून नेताना येते . ट्रेनचं अस्तित्व स्थलांतरितांचे दुखः व्यक्त करणाऱ्या प्रतीकासारखं वाटतं ते यामुळेच . रावीपार कथेतील दर्शन सिंहा च्या परिस्थितीवश आलेल्या हतबलतेचं रुपांतर निर्दयतेत होतं. दुसऱ्या
महायुद्धाच्या काळात नाझींनी gas chamber मध्ये कोंडून केलेली हजारो ज्यूची कत्तल ही जाणीवपूर्वक ,वांशिक द्वेषातून उगवलेल्या निर्दयतेतून झाली होती .दर्शन सिंहाचे कृत्य नकळत हतबलतेतून झालेले आणि ज्यूंचे शिरकाण हे जाणीवपूर्वक विद्वेषाचा परिणाम ,मग दोन्हीचा अंत कुणाचे तरी प्राण गमावण्यात झाला असेल तर त्यात फरक तो कसा करायचा ?निर्दयतेची जातकुळी वेगळी असली तरी त्याचा अंत निर्णायक प्राणघातक शेवटातच ठरलेला. या सगळ्या पाशवी कृत्याचा ,त्यामागच्या निर्दयीपानाचा उगम पाय रोवून उभी असलेली जमीन हिरावून घेतल्यामुळे होत असेल की त्यांच्या वैयक्तिक दु :खाचे रंग विस्कटल्यामुळे होत असेल ?या प्रश्नाच्या प्रवासाचा अंत नाही . रावी ने हे सगळं कसं बघितलं असेल ,कसं पचवलं असेल?
या सगळ्या विस्कटवणाऱ्या वादळी पावसानंतर तिची अश्राप नितळता तशीच पूर्वीसारखी राहिली असेल?
की तिचंही दिवसागणिक बदलत जाणाऱ्या माणसांसारखं ,परिस्थितीसारखं होत असेल ?
मनातल्या या प्रवासाची रावी समोर पुन्हा पुन्हा उजळणी झाली . रावी किनारी उंचच उंच खडकं आहेत ,लहान मोठ्या आकारांची दगडं आहेत . तिथल्याच भल्या मोठ्या खडकावर बसून रावी च्या नजर पोचेल तिथल्या परिसराकडे बघत होते ,रावी किनारी आपल्या नद्यांच्या काठी दिसणारी वाळू दिसत नाही . तिथला सगळा किनारा दगड गोट्यांनी घेरलेला ,डोंगरातून वाहणाऱ्या नद्यांचं हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल ,तेव्हा मागच्या उत्तराखंड च्या कॉर्बेट मधून वाहणारी कोसी नदी आठवली . तिचं पात्र रावी इतकं नसलं तरी बऱ्यापैकी रुंद च ,आणि ते ही असेच दगड गोट्यांनी भरलेली ,त्यांत आलेलं पावसाळ्यातलं पाणी दगड गोट्यामुळे आत थोपवता येत नाही ,त्याचे विस्कटून गेलेले किनारे बघून मागच्या पुराचा तडाखा जाणवला ,उत्तरेतील नद्यांचे यावर्षीचे थैमान ऐकून तेच दृश्य नजरेसमोर आले. हिमालयाच्या पायथ्याशी असण्याचं भाग्य ही त्यांना लाभलय ,पण त्यांच्या दुख:ची range ही विशाल ,सभोवतालचा निसर्ग नजरेची पारणे फेडतो ,तर त्यांच्या काठची घटीते मनाला विषण्णता ही आणतात . असं सगळं असून ही रावी किनारी रेंगाळून ही चालणारं नव्हतं ,पुढचा प्रवासाचा पल्ला गाठून पुन्हा परत फिरायचं होतंच . म्हणून उतरणाऱ्या दिशेने च चढलो आणि मागे वळून बघत बघत पुढच्या चंबा कडच्या प्रवासाला लागलो ,रावी चं वळण विसरून इतर कुठे वळायला मन मात्र मानत नव्हतं ,डलहौसी हून निघताना लागलेला पाऊस ,मधल्या break नंतर पुन्हा कोसळायला लागला . पावसाचे प्रत्येक ठिकाणचे अनुभव ही वेगळेच ,मला इकडचा पावसाळा सुरु झाला की निरनिराळ्या ठिकाणचा अनुभवलेला पाऊस मनात हमखास एखाद्या कोसळणाऱ्या पावसाळी संध्याकाळी टपावर टपटपणाऱ्या पावसाच्या थेबांच्या आवाजासारखा वाजतोच . लहान असताना गंगाखेड चा पाऊस आणि त्याचं अंगणात कोसळणारं पाणी मग त्यासाठी बादल्या खाली ठेवायला लागायच्या ,वरच्या गच्चीवरनं खाली पाणी येण्यासाठी पाईप टाकण्यात आले होते ,त्या पाईपातून पाणी कोसळून कोसळून अंगण पाण्याने पुरतं भरून जायचं ,तेव्हा या बदल्या भरून ते पाणी बाहेर सोडता यायचं ,मग आम्हा मुलांना त्या बदल्यात कागदी नावा सोडता यायच्या ,त्यापेक्षा ही मजा असायची ती शाळेला सुटी मिळायची म्हणून ,शाळा नदी काठी असल्यामुळे थोडा जास्त पाऊस आला की गोदावरीचं पाणी शाळेत शिरायचं ,ते ओसरेपर्यंत सुटीच . तो पावसाचा निखळ ,निरागस अनुभव असायचा ,नंतर च्या पावसाची सौंदर्यशास्त्रीय मीमांसा करायला जमायला लागली पण त्यातलं निर्भेळ सुख कायमचं हिरावलं गेलंच ,ते इतकी वर्षं मी शोधते आहे तरी गवसत नाही ते नाहीच . त्यानंतरच्या इतर शहरातील पावसाची ओळख निमित्तानिमित्ताने व्हायला लागली ,औरंगाबाद चा पाऊस शांत ,संयत गझलेसारखा भासायचा ,वाटायचं त्यात बेगम अख्तर ची खर्जातली गझल मिसळून तो विलोभनीय करावा ,तसा तो व्हायचाही ,बेंगलोर चा पाऊस तिथल्याच IT Pofessionals सारखा sofisticated वाटून गेला ,पोंडीचेरी चा पाऊस आध्यत्मिक भावनेचा ,मनाने मला नेहमीच अरविंदआश्रमातील दीर्घ शांततेचा अनुभव देणारा वाटत आलाय ,मुंबई च्या पावसाचा पुढच्या मागच्या क्षणाशी संबंध नसतोच ,तो local च्या peak hours मधील गर्दी सारखा ,क्षणात स्टेशन भरतो ,क्षणात रिकामं करतो ,त्या सगळ्या आठवणी स्वतःची कशी गैरसोय होतेय या पिरपिरनाऱ्या मानसिकतेशी जुळणाऱ्याशा वाटतात . मनात रेंगाळतो तो गोव्याचा पाऊस ,तो क्षणात कोसळतो ,दुसऱ्या क्षणी थांबतो ही ,पण मधले क्षण नितळ आसक्तीचे ,हिरव्याकंच निसर्गाचे ,गोव्यातील उन्मुक्त वातावरणाचा अनुभव देणारे ,तो अनुभवायला दर पावसाळ्यात जावसं वाटतं . हिमालयातील पावसाचा अनुभव त्याच्यासारखाच दिव्य या शब्दात सामावणाराच . हिमालयातील सौन्दर्यासारखीच पावसाची ही तुम्हाला भुरळ पडते ,ती तेवढ्यापुरती . तिथला निसर्ग तुम्हाला सदा सर्वकाळ हिरव्या /शुभ्र बर्फाच्छादित डोंगर दऱ्याच्या आठवणीने वेढून असतो .पण पावसाचं मात्र तसं नाही ,तो तुमचे समोर चे मार्गच बंद करतो . तरी पावसामुळे विस्कळीत होणाऱ्या जनजीवनाची कीव येण्यापेक्षा हिमालायासारखच धीरोदात्तपणे सामोरे जाणाऱ्या माणसामुळे आपलं स्पिरीट कणभर वाढलंय अशीच फिलिंग येते . रावी ने किती पूराचे तडाखे झेललेत ,त्यातून बाहेर आलेलं जनजीवन कशा मनस्थितीत राहत असेल ,पुढचा पावसाळा त्यांच्या मनात धडकी तर भरवत नसेल?की या सकटचं जगणं स्वीकारणं त्यांचं भाग्धेयचं असेल . कळायला मार्ग नाही . रावी चे पुराचे अनुभव जास्त यातनेचे की फाळणीचे ?मानव निर्मित दुखःसाहणं जास्त वेदनेचं की निसर्गनिर्मित ? की दोन्ही वेदना “ दुख सहने की एक ही रीत या पठडीतलं . दुखः वेगवेगळी पण साहण्याची रीत एकच .
पावसाचं कोसळणं सुरूच होतं ,चंबा आलं तरी तो थांबला नाहीच .मग वाटलं की हा थांबणार नाहीच, अजून किती तरी काळ असाच अव्याहतपणे कोसळतच राहणार . तो दिवस रविवारचा असल्यामुळे व उरलं सुरलं पावसामुळे
चंबा त कर्फ्यू लागल्यासारखी भयाण शांतता होती.बाजार ही रविवार असल्यामुळे पूर्ण बंद . त्यामुळे हातरुमाल आणि चांदीची दागिने बघणे बारगळले ,शहरात एखादे हॉटेल ही सुरु नव्हते . मुंबई सारख्या शहरातून तिकडे गेल्यावर हे पचणे अंमळ कठीणच होते ,मुंबईतील बाजार रविवारी तर उधाणलेले असतात,हॉटेल्स तर माणसांनी वाहत असतात .पण चंबा मध्ये हॉटेल बंद असणं म्हणजे काय असतं याचा जवळून अनुभव घेतला .चंबा चे ऐतिहासिक संग्रहालय बघता आले नाही ,चंबा एरवी प्रसिद्ध आहे ते मंदिरे आणि राजवाड्यासाठी ,एका अर्थाने त्यातून हजारो वर्षांपासून च्या पर्वतराजीमधील संस्कृतीची धरोहर तिथे जपल्या गेली आहे ,ते अर्थात नंतर शोध घेत गेल्यामुळे कळलं ,पण ते काहीच बघता ,अनुभवता आलं नाही . रावी भेटी मुळे त्या सगळ्याचे तितकेसे दुखः झाले नाही ,त्यामुळे रविवार च्या बंद ची चौकशी न करता एवढा मोठा बेत आखल्या गेल्याचे दोषारोप ही झाले नाहीत . रावी चा मूड ही तसाच राहिला ,तो मात्र एवढ्या सगळ्यानंतर ही विस्कटला गेला नाही .
परतीच्या वाटेला लागलो ,वाटेत पुन्हा एक सुंदर तळं आणि धरण दिसलं ,हिरव्या डोंगरराजींमध्ये ,गच्चं मेघांनी भरलेलं आभाळ त्यावर कललं होतं ,आणि पाण्याचा रंग निसर्गचित्रांमधून अवतरलेल्या रंगासारखा स्वच्छ् हिरवा -निळा होता . हिरव्या निळ्या रंगाच्या छटेला नेमकं काय म्हणतात ?हे तेव्हाही सुचलं नाही आणि आता ही सुचत नाही ,पण कुठेतरी त्या रंगात कोकणातील कुडाळ वरनं तारकर्ली ला जाणाऱ्या रस्त्यावर भेटणाऱ्या धामापूर च्या तळ्याचा रंग मिसळला . रावीच्या पाण्यावरचं ते धरण”चमेरा धरण “नावानं उभारलं गेलं होतं आणि ते धरण बनतानाच त्या पाण्यातून एक सुंदर तळं निर्माण झाला ,त्यालाच चमेरा तळं असं म्हटलं जातं . त्याच्यावरच हिमाचल प्रदेश चा मोठा hydro electric project उभारला गेलाय . आकाश,जमीन आणि पाणी या तीन सूत्राचा विलोभनीय झालेला संगम तिथे बघण्यात येतो . रावी बद्दलचे माझे पूर्वीचे ग्रे शेड चे संदर्भ एका क्षणापुरते झाकोळले गेले ,त्याची जागा आता ब्लू -ग्रीन शेड ने घेतली . मग मी नव्याने निसर्गाच्या या अविस्मरणीय करामतीचे माझ्या आतल्या आत चित्र रंगवत बसले ,माझा कॅमेरा त्यातली बेनाम रंगांची उधळण साठवण्यात मग्न झाला .
आता मात्र नक्कीच दोन भिन्न भावनेच्या प्रवासात भेटलेली “रावी “पार करणं मला कधीच शक्य होणार नाही .
रावी तिकडे मात्र बशीर बद्र चा शेर आळवत बसली होती ,
“मुन्सीफ भी मैं हुं
मुल्जीम भी मैं हुं
कोई सुरत नही रिहाई की .”
Comments
Post a Comment